Monday, August 25, 2008

सुखामागे धावता धावता


सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही मग माशाची भागत नाही तहान

स्वप्नं सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी वाटीनं ओतलं तरी कमीच पडतं तूप

बायको आणि पोरांसाठी चालतो म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ

करियर होतं जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती, 'पैसा छापायचं यंत्र'

चुकून सट्टी घेतलीच, तर स्वत: पाहुणा स्वता:च्या घरी
दोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारू लागतात "बाबा, अजून का हो घरी?"
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी

क्षणिक औदासि न्य येतं, मात्र पुन्हा सुरू होतं चक्र
करियर करियर दळण दळता, स्वास्थ्य होतं वक्र

सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या,
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही सारवलेल्या

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी मुळी श्वासच घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता, आअशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं

--
अज्ञात

Monday, July 28, 2008

यात काही पाप नाही!


सिगारेटचा जेंव्हा तुम्ही
मजेत घेता मस्त झुरका
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप


-- मंगेश पाडगावकर


Wednesday, July 16, 2008

यांचं असं का होतं कळत नाही


यांचं
असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

निळं निळं वेल्हाळ पाखरू, आभाळात उडणार
रूपेरी वेलाण्टी घेत मासा, पाण्यात बुडणार
याचं सुख नसतंच मुळी, कधी त्यांच्यासाठी
एकच गोष्ट त्यांची असते ,"कपाळावर आठी"

कधीसुद्धा यांची पापणी ढळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

मोठ्याने हसा तुम्ही, त्यांना नैतिक त्रास होतो
वेलची खाल्लीत तरी, यांना व्हिस्कीचा वास येतो.
यांचा घोषा सुरू असतो, "अमकं खाणं वाइट की डोकं जडसं होतं"
"तमकं मुळीच पिऊ नका, त्याने नक्की पडसं होतं"

संयमाचे पुतळेच हे, त्यांचं मन चुकूनही चळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

सगळेच कसे बागेमधे, व्यायाम करीत बसणार?
किंवा हातात गीता घेऊन, चिंतन करीत बसणार?
बागेतल्या कोप-यात कोणी, घट्ट बिलगून बसतंच ना?
गालाला गाल लाऊन, गुल गुल करीत असतंच ना?

नैतिक सामर्थ्याचं त्यांच्या वेगवान घोडं असतं
पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं !
या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

कसल्याही आनंदाला ते, सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं, आयुष्य पीत असतात
एरंडेल प्यायलयावर, आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं, दुसरीकडे कुठे जाणार?

कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

--मंगेश पाडगावकर