skip to main |
skip to sidebar
सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही मग माशाची भागत नाही तहान
स्वप्नं सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी वाटीनं ओतलं तरी कमीच पडतं तूप
बायको आणि पोरांसाठी चालतो म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ
करियर होतं जीवन, मात्र जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती, 'पैसा छापायचं यंत्र'
चुकून सट्टी घेतलीच, तर स्वत: पाहुणा स्वता:च्या घरी
दोन दिवस कौतुक होतं, नंतर डोकेदुखी सारी
मुलंच मग विचारू लागतात "बाबा, अजून का हो घरी?"
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी
क्षणिक औदासि न्य येतं, मात्र पुन्हा सुरू होतं चक्र
करियर करियर दळण दळता, स्वास्थ्य होतं वक्र
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या,
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी मुळी श्वासच घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता, आअशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं
-- अज्ञात